भिलार : (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे भोसे येथील एका हॉटेल परिसरात ‘घरात डोकावल्याच्या’ कारणावरून झालेल्या वादातून एका २४ ते २५ वर्षीय पर्यटकाचा लाकडी काठी आणि दगडाने जबर मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय रमेश जाधव (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत ४ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिकृत माहिती अशी की, फिर्यादी विशाल अजित जाधव (वय ३०, रा. बोरी, ता. इंदापूर, जि. पुणे) हे त्यांचे मित्र आणि मयत अक्षय जाधव यांच्यासह ८ जुलै रोजी महाबळेश्वर जवळील भोसे येथील ‘अतिथी व्हिला हॉटेल अँण्ड लॉज’ येथे मुक्कामासाठी आले होते. रात्रीच्या वेळी सर्वांनी दारू प्यायली होती. अक्षय याने जास्त मद्यप्राशन केल्याने मित्रांनी त्याला खोलीत झोपवून बाहेरून कडी लावली आणि ते टेरेसवर बसले होते.
काही वेळानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र खोलीवर आले असता त्यांना अक्षय तिथे दिसला नाही. त्यांनी शोध घेतला असता, हॉटेलपासून सुमारे २०० मीटर अंतरावर लोकांची गर्दी आणि बॅटरीचा उजेड दिसला. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, आरोपींच्या घरात डोकावल्याच्या कारणावरून स्थानिक संशयितांनी अक्षयला घेरले होते.
संशयित आरोपींनी अक्षयला जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी, लाकडी काठीने आणि दगडाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अक्षय गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.
गंभीर जखमी झालेल्या अक्षयला त्याच्या मित्रांनी तातडीने पाचगणी येथील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर वाई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि नातेवाईकांच्या सूचनेवरून त्याला बारामती येथील डॉ. बोके यांच्या रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तिथे तपासणीपूर्वीच डॉक्टरांनी अक्षयला ‘मयत’ घोषित केले.
घटनेनंतर सुरुवातीला बारामती शहर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला होता, तो पुढील तपासासाठी ऑनलाईन पद्धतीने पाचगणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
पाचगणी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३(१), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून खालील चार आरोपींना ताब्यात घेतले आहे:
१. सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता. महाबळेश्वर)
२. अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता. वाई)
३. राहुल जनार्दन राजपुरे (रा. कनुर, ता. वाई)
४. अमोल गणेदेव वाडकर (रा. चिखली, ता. वाई)
घटनेची माहिती मिळताच वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साळुंखे साहेब आणि पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) डी. जी. पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि डी. जी. पवार करत आहेत.

