महाबळेश्वर:(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटनवाढीच्या घोषणा कागदावरच राहत असल्याचे चित्र दिसत आहे. महाबळेश्वर–मेटतळे–प्रतापगड मार्गाची झालेली दयनीय अवस्था प्रशासनाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावरील खड्डे आणि उखडलेल्या डांबरीकरणामुळे नागरिक व पर्यटक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मेटतळे येथील ग्रामस्थांनी थेट रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केले.
रस्ता की खळगा? प्रवाशांचा संतप्त सवाल
महाड नाका परिसर, अप्सरा हॉटेलजवळ तसेच महाबळेश्वर–प्रतापगड मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांचा आकार इतका मोठा झाला आहे की, “रस्ता आहे की खळगा?” असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.
तात्पुरत्या मलमपट्टीमुळे अवस्था बिकट
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील पावसाळ्यात काही ठिकाणी केवळ तात्पुरते काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा खड्डे बुजविण्याचे कोणतेही ठोस काम झाले नाही. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच गंभीर बनली असून वाहनांचे नुकसान, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
पर्यटकांकडून तीव्र नाराजी
महाबळेश्वरला भेट देणाऱ्या पर्यटकांनीही या रस्त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. “देश-विदेशातून पर्यटक मोठ्या आशेने येथे येतात, पण येथील रस्त्यांची ही अवस्था अत्यंत निराशाजनक आहे. दाट धुक्यात खड्डे दिसत नाहीत, अचानक वाहन खड्ड्यात आदळल्याने अपघात होण्याची भीती कायम असते. कुटुंबासह प्रवास करताना असुरक्षित वाटते,” अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी दिली.
लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना खड्डे दिसत नाहीत का?
महाबळेश्वर–प्रतापगड हा सुमारे २२ किलोमीटरचा अत्यंत महत्त्वाचा पर्यटन घाटमार्ग असून दररोज हजारो वाहने येथून धावतात. मात्र येथे डिव्हायडर नाहीत, साईडपट्ट्यांचा अभाव आहे. “या मार्गावरून रोज लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी प्रवास करतात, तरीही त्यांना जनतेचा होणारा त्रास कसा दिसत नाही?” असा उपरोधिक सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
”पर्यटनातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, मात्र सुरक्षित रस्ते देण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे. गेल्या ३ वर्षांपासून तक्रारी करूनही कारवाई झालेली नाही, उद्या मोठा अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?” असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. अखेर “रस्ते दुरुस्त होत नसतील, तर निदान या खड्ड्यांत झाडे तरी वाढतील” असा टोला लगावत ग्रामस्थांनी खड्ड्यांत झाडे लावली.
…अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाबळेश्वर नगर परिषदेकडे खालील मागण्या केल्या आहेत:
संपूर्ण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
सर्व खड्डे कायमस्वरूपी बुजवण्यात यावेत.
आवश्यक ठिकाणी डिव्हायडर व साईडपट्ट्यांची उभारणी करावी.
मागण्या मान्य न झाल्यास येत्या काळात अधिक तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनात सहभागी प्रमुख मान्यवर:
या अनोख्या आंदोलनात मेटतळेचे सरपंच विठ्ठल रामचंद्र शिंगरे, संत रोहिदास समाज फाउंडेशनचे अध्यक्ष संपत धोंडिबा कदम, ज्येष्ठ समाजसेवक भाऊ शिंगरे, शिवसैनिक दिलीप शंकर जाधव, राजू रेवणे, भाऊ बोराणे, तुकाराम शिंगरे, सुरेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. या आंदोलनाची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा असून प्रशासन आतातरी जागे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

