ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा रोटरीचे माजी अध्यक्ष सुनील कांबळे यांचे निधन; पाचगणीसह महाबळेश्वर तालुक्यात शोककळा
पाचगणी | (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी
आपल्या धारदार, अभ्यासू आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून पाचगणी व परिसरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे ‘दैनिक सकाळ’चे पाचगणी येथील ज्येष्ठ पत्रकार, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष, सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुनील गंगाराम कांबळे (वय ६७) यांचे आज, मंगळवारी सकाळी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या अकस्मात निधनाने पाचगणीसह संपूर्ण महाबळेश्वर तालुका आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता, सामाजिक व राजकीय क्षेत्रात तीव्र शोककळा पसरली आहे. ‘सुनील कांबळे नावाचे एक पर्व हरपले’, अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली.
सुनील कांबळे यांनी आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या कारकिर्दीत पाचगणी आणि परिसरातील नागरी समस्या, पर्यटन, पर्यावरण तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांना सातत्याने आणि प्रखरपणे मांडले. जनतेच्या समस्या केवळ वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका राहिली.
सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. पाचगणी रोटरी क्लबच्या संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून त्यांनी क्लबच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक विविध उपक्रमांना चालना दिली. रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या कार्यकाळात क्लबला अनेक उत्कृष्ट पुरस्कार मिळाले. प्रसिद्ध पाचगणी फेस्टिव्हलच्या यशस्वी आयोजनातही त्यांचा नेहमीच पुढाकार आणि सक्रिय सहभाग असायचा. सध्या ते रोटरीच्या ‘सिल्व्हर ओक’ या विशेषांकाच्या संपादनाची धुरा सांभाळत होते.
सामाजिक व राजकीय वारसा
सुनील कांबळे यांना सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा लाभला होता. पाचगणीचे माजी उपनगराध्यक्ष दिवंगत गंगाराम कांबळे यांचे ते चिरंजीव, तर माजी नगरसेविका रेखा कांबळे यांचे पती होते. तसेच पाचगणी नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अमित कांबळे यांचे ते चुलते होत.
मनमिळाऊ स्वभाव, स्पष्टवक्तेपणा आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींशी स्नेहाचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने पाचगणीच्या सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचा दुवा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
वैकुंठधामात अंत्यसंस्कार
त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन विवाहित मुली, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता पाचगणी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पत्रकार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी कांबळे यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
पाचगणीच्या सामाजिक, पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सुनील कांबळे यांच्या निधनाने एक अभ्यासू पत्रकार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आणि जिव्हाळ्याचा सहकारी कायमचा हरपला आहे.
