शेतकऱ्यांना घरबसल्या खताचे बुकिंग करता येणार ; उपलब्ध विक्रेत्याची निवड करून QR कोडद्वारे मिळणार खत
Khndala news खंडाळा :(टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
शेतकऱ्यांना रासायनिक खतांची सुलभ, पारदर्शक व गरजेनुसार उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी दि. २२ ऑक्टोबर पासून एफ.एफ.एस प्रणालीद्वारे रासायनिक खत विक्री अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी दुकानांमध्ये अथवा वितरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी किंवा रांगा लावण्याची आवश्यकता राहणार नाही. शेतकरी आपल्या मोबाईलवरून उपलब्ध खतांची माहिती पाहून,आपल्या पिकासाठी आवश्यक खताचे बुकिंग करून,उपलब्ध विक्रेत्याची निवड करू शकणार आहेत.
एफ.एफ.एस प्रणालीच्या माध्यमातून तालुक्यात रासायनिक खतांच्या वितरण व्यवस्थेत पारदर्शकता, मागणीवर आधारित वितरण,उपलब्धतेची माहिती आणि विक्री व्यवहाराची डिजिटल नोंद यांना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि अधिकृत विक्रेत्याकडून आवश्यक खत मिळण्यास मदत होईल. तसेच खत वितरण व्यवस्थेवर प्रशासनाला प्रभावी देखरेख ठेवणे सुलभ होणार आहे.
या प्रणालीचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून एफ.एफ.एस.ॲप डाउनलोड करून आधार किंवा फार्म आयडीद्वारे लॉगिन करावे. लॉगिननंतर शेतजमिनीचा सर्वे नंबर, पिकाची माहिती आणि खताचे आवश्यक प्रमाण नोंदवून उपलब्ध विक्रेत्याची निवड करावी लागेल. बुकिंग पूर्ण झाल्यावर मोबाईलवर जनरेट झालेला क्यूआर (QR) कोड दाखवून विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. हा क्यूआर कोड ७२ तासांसाठी वैध असेल.
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना पिकानुसार आणि क्षेत्रानुसार आवश्यक असलेल्या खताची मागणी नोंदवल्यामुळे गरजेपुरतेच खत उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्याला आवश्यक असलेले खत मिळविण्यासाठी इतर अनावश्यक खताची खरेदी करण्यास भाग पाडण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
काळ्याबाजारास प्रतिबंध
खताची मागणी, उपलब्धता व विक्री यांची प्रणालीद्वारे नोंद होत असल्यामुळे अनधिकृत साठवणूक,कृत्रिम टंचाई व काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.कृषी उपयोगासाठी उपलब्ध होणाऱ्या युरियाचा औद्योगिक अथवा इतर अनधिकृत वापर रोखण्यासाठी प्रणालीमुळे पुरवठा व विक्री व्यवहार अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल. तसेच अधिकृत विक्री व्यवहार प्रणालीमध्ये नोंदविले जात असल्याने बनावट किंवा डुप्लिकेट खताच्या विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा निर्माण होईल.
खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन
सर्व शेतकऱ्यांनी येत्या गुरुवारपासून एफ .एफ.एस प्रणालीचा वापर करूनच रासायनिक खतांची खरेदी करावी. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. खत खरेदी करताना अनधिकृत व्यक्ती किंवा विक्रेत्याकडून खत खरेदी करू नये. कोणत्याही प्रकारचे अनावश्यक खत घेण्याची सक्ती, लिंकिंग, जादा दराने विक्री, काळाबाजार किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधित बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी.
अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय अथवा कृषि अधिकारी, पंचायत समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन कृषी अधिकारी भारत बोडरे यांनी केले आहे.
Khndala news
