Oplus_16908288
रेंगडीतील फार्महाऊसवर मेढा पोलिसांची कारवाई; मुंबई पोलिसांच्या स्वाधीन

मेढा प्रतिनिधी : अभिनेत्रीवरील अत्याचार व लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी मुंबई पोलिसांना हवा असलेला चित्रपट दिग्दर्शक व निर्माता शकील नुरानी याला सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील रेंगडी येथून मेढा पोलिसांनी ताब्यात घेतले. नुरानी हा रेंगडी येथे फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर मेढा पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याचा ताबा घेतला.
मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्यात नुरानीविरुद्ध ३३ वर्षीय अभिनेत्रीने अत्याचार व लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. आगामी चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने नुरानी यांनी अभिनेत्रीला घरी बोलावून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तिला नशेचे पदार्थ देणे आणि कथित चित्रिकरणाच्या माध्यमातून धमकावल्याचेही आरोप करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मालवणी पोलिस नुरानीचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तपासादरम्यान तो सातारा जिल्ह्यातील रेंगडी (ता. जावली) येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी मेढा पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी धीरजकुमार बेचके व शिवाजी डफळे यांनी रेंगडी येथील नुरानीच्या शेतघरावर सायंकाळी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, मुंबई पोलिसांचे पथक मेढा पोलिस ठाण्यात दाखल झाले. मेढा पोलिसांनी नुरानीला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले असून, त्याच्यावरील पुढील कायदेशीर कारवाई मुंबईत करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे जावली तालुक्यासह सातारा जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
