Oplus_16908288
भिलार प्रतिनिधी : पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. माधुरी अजित कासुर्डे यांची बिनविरोध निवड झाली असून, स्वीकृत नगरसेवकपदी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण बोधे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी योगेश खैरमाटे यांनी विशेष सभेत या निवडींची अधिकृत घोषणा केली.
माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत उपनगराध्यक्षपदासाठी माधुरी कासुर्डे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. ‘श्री घाटजाई शहर विकास आघाडी’च्या सत्ताकाळात ना. मकरंद आबा पाटील, आघाडी प्रमुख शेखर कासुर्डे आणि नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना टप्प्याटप्प्याने संधी देण्याच्या सूत्रांतर्गत ही खांदेपालट झाली आहे.
दरम्यान, सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या प्रवीण बोधे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाची दखल घेत आघाडीने त्यांना स्वीकृत सदस्यपदाची जबाबदारी देऊन पक्षांतर व निष्ठेचे फळ दिले आहे.
निवडीची अधिकृत घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतशबाजीत शहरातून जोरदार विजयी मिरवणूक काढली. मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा माधुरी कासुर्डे यांनी सर्व सहकाऱ्यांना आणि नगरसेवकांना सोबत घेऊन पांचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला. या सभेला मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
