भिलार (कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
सतत सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेने शहरातील धोकादायक झाडे हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. शहरातील विविध भागांतील सिल्व्हर ओकसह इतर मोठ्या वृक्षांची पाहणी करून जी झाडे धोकादायक स्थितीत असल्याचे आढळत आहेत, ती तातडीने हटविण्याचे काम सुरू आहे.
अलीकडील मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्याने प्रशासनाने कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम राबविली आहे. नगरपरिषदेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचारी अत्याधुनिक साधनसामग्रीच्या साहाय्याने धोकादायक झाडे काढण्याचे काम करत आहेत.
या मोहिमेची पाहणी नगराध्यक्ष दिलीप बागडे, नगरसेवक नारायण बिरामणे, शेखर कासुर्डे तसेच इतर नगरसेवकांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
पाचगणी गिरीस्थान नगरपरिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात धोकादायक स्थितीत असलेले वृक्ष आढळल्यास त्याची माहिती तातडीने नगरपरिषद प्रशासनाला द्यावी, जेणेकरून आवश्यक ती कारवाई करून संभाव्य दुर्घटना टाळता येईल.
पंडित पाटील -मुख्याधिकारी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद पाचगणी

पाचगणी नगरपरिषदेचे कर्मचारी धोकादायक वृक्ष काढताना
