भिलार प्रतिनिधी | पाचगणी
पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. अशातच बुधवारी दुपारी पाचगणी येथील प्रसिद्ध शॉपिंग सेंटरच्या आवारात, ‘हॉटेल फ्रेंड्स ट्रीट’ समोर उभा असलेला भलामोठा सिल्व्हर ओकचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडल्याने एक चारचाकी व एक दुचाकी झाडाखाली दबून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांत मोरे यांनी आपली चारचाकी (क्र. MH 11 DU 8787) शॉपिंग सेंटरच्या आवारात उभी करून काही वेळापूर्वीच कार्यालयात प्रवेश केला होता. ते कार्यालयात पोहोचताच अचानक मोठा आवाज झाला. बाहेर येऊन पाहिले असता त्यांची आलिशान चारचाकी गाडी महाकाय सिल्व्हर ओकच्या झाडाखाली पूर्णपणे दबलेली होती. या दुर्घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले.
याच झाडाखाली प्रताप कऱ्हाडकर यांच्या मालकीची दुचाकीही दबली असून, तिचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
दुपारची वेळ आणि मुसळधार पावसामुळे या परिसरात नागरिकांची वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, हीच घटना सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घडली असती तर मोठा अनर्थ ओढवला असता, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.
सध्या पाचगणी परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अनेक झाडे धोकादायक स्थितीत आली असून, नागरिकांनी तसेच पर्यटकांनी अनावश्यकपणे झाडांच्या परिसरात वाहन उभी करू नयेत व प्रशासनानेही धोकादायक वृक्षांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
