तांत्रिक तपास आणि तत्पर कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ
भिलार, (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क )
पाचगणी पोलीस ठाण्याच्या तत्पर, प्रभावी आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे २५ नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन पुन्हा मिळाले असून, सायबर फसवणुकीत आर्थिक नुकसान झालेल्या नागरिकांना तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांमधून पाचगणी पोलिसांबद्दल समाधानाची भावना व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
चालू वर्ष २०२६ मध्ये पाचगणी परिसरातून मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. याशिवाय काही नागरिक ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे (सायबर फ्रॉड) बळी ठरले होते. या सर्व प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत पाचगणी पोलिसांनी तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विविध यंत्रणांशी समन्वय साधत गहाळ मोबाईल शोधून काढले. तसेच सायबर फसवणुकीत अडकलेली रक्कमही संबंधित अर्जदारांना परत मिळवून देण्यात यश मिळवले.
या यशस्वी कारवाईत पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पाचगणी पोलीस पथकाच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशांसह गहाळ झालेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी पाचगणी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे व तत्परतेचे मनापासून कौतुक केले आहे.
