mahabaleshwar
भिलार/ प्रतिनिधी (टीम कृष्णकुंज न्यूज)
Satara Rain Alert सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाई उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हा आदेश दि. ७ जुलै २०२६ ते १० जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज व रेड अलर्ट जारी केल्याने वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यात दरड कोसळणे, भूस्खलन, पूरस्थिती आणि अन्य नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढला आहे. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील धबधबे, धरणे, तलाव, नदीपात्रे, घाट परिसर तसेच प्रमुख पर्यटनस्थळांवर नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. महाबळेश्वरमधील आर्थर सीट, केट्स पॉईंट, एलिफंट्स हेड पॉईंट, लिंगमळा धबधबा, विल्सन पॉईंट, सावित्री पॉईंट, प्रतापगड परिसर, तापोळा तसेच इतर पर्यटनस्थळांचा यात समावेश आहे.
पर्यटनस्थळांवर ‘धोकादायक क्षेत्र’ आणि ‘प्रवेश निषिद्ध’ असे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. घाट परिसरात वाहने काळजीपूर्वक चालवावीत, धबधबे, ओढे, नदीपात्र आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, तसेच पूराच्या पाण्यावरून वाहन चालवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उपविभागीय अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
