Panchgani Breaking
रमाईनगरसह विविध भागांची पाहणी; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना
भिलार | प्रतिनिधी
Panchgani Breaking जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या पाचगणी शहरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागले असून, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नागरिकांसह पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पाचगणी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी नगरसेवक शेखर कासुर्डे, अमित कांबळे, नगरसेविका राजश्री सणस आणि आकाश बगाडे यांच्यासह शहरातील विविध भागांचा, विशेषतः रमाईनगर झोपडपट्टी परिसराचा वादळी दौरा करून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
मुसळधार पावसामुळे रमाईनगर परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी बाधित नागरिकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तसेच नुकसानग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या.पाचगणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ असून येथे देश-विदेशातील पर्यटक तसेच निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी वास्तव्यास असतात. त्यामुळे रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करणे, उन्मळून पडलेली झाडे तातडीने हटवणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना २४ तास सतर्क राहून युद्धपातळीवर मदतकार्य राबविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषदेच्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
