Oplus_16908288
पांचगणी , (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क): पाचगणी शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना आधीच मोठा त्रास सहन करावा लागत असताना आता माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळेही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी देशपांडे हॉस्पिटल शेजारी दोन माकडांच्या टोळक्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.याच वेळी शेजारील अकॅडमीमधील विद्यार्थ्यांची शाळा चार च्या सुटल्याने विद्यार्थी बाहेर पडत होते. माकडांची झटापट सुरू असल्याने विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.पाचगणी शहरात मोकाट कुत्री, घोडे व इतर जनावरांचा प्रश्न अद्याप कायम असतानाच आता माकडांचाही उपद्रव वाढत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः शाळा, रुग्णालये आणि गर्दीच्या परिसरात अशा घटना घडत असल्याने एखादी गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील मोकाट जनावरे आणि माकडांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषद व संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
