जननी माता परिसरातील बंगल्यात बिबट्याची धडक; कुत्र्यावर हल्ला करून केले जखमी — वन विभागाकडून बंदोबस्ताची मागणी
भिलार प्रतिनिधी : टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क
भिलार परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिलार येथील जननी माता परिसरात एका बंगल्याच्या आवारात बिबट्या शिरल्याची घटना घडली. यावेळी बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याने कुत्रा जखमी झाला.
जननी माता परिसरात बिबट्याने थेट बंगल्याच्या आवारात प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे तसेच परिसरात एकट्याने फिरणे नागरिक टाळत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भिलार परिसरात यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याच्या वावराबाबत चिंता वाढली आहे.
वन विभागाने जननी माता परिसरासह भिलार परिसराची तातडीने पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा, आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे बसवावेत तसेच परिस्थितीनुसार पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे, पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे किंवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
https://youtu.be/zZ0EdTnyxaM?si=XWzirWhKZPMbob0B
