Oplus_16908288
मुख्य रस्त्यांवर घोडे, गायी, गाढवांचा वावर; अपघातांची भीती वाढली, पालिका प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप
भिलार | (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
हवेशीर पर्यटनस्थळ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात सध्या मोकाट जनावरांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक आणि पर्यटक त्रस्त झाले आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी घोडे, गायी व गाढवे मुक्तपणे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाई–पाचगणी–महाबळेश्वर या प्रमुख पर्यटन मार्गासह पाचगणी–गणेशपेठ रस्त्यावर अनेक ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागत असून किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मुख्य बाजारपेठ, भाजी मंडई, बसस्थानक परिसर, नाका, शॉपिंग सेंटर, महात्मा फुले शाळा तसेच महाविद्यालय परिसरातही मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मोकाट जनावरे आता केवळ रस्त्यांपुरती मर्यादित न राहता घरांमध्ये व व्यावसायिक आस्थापनांमध्येही घुसत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकत्याच एका नगरसेवकाच्या घरात रात्रीच्या वेळी घोडा घुसल्याची घटना घडल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. सकाळी घरातील सदस्यांना घरात घोडा दिसल्याने एकच गोंधळ उडाला.
नागरिकांचे म्हणणे आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येवर कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. मोकाट जनावरे पकडण्यासाठी आवश्यक असलेला कोंडवाडा कार्यरत आहे की नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे पालिकेने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसह पाचगणीच्या पर्यटन प्रतिमेचा विचार करून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
