Oplus_16908288
कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव संचलित दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय, दापवडी (ता. जावळी, जि. सातारा) या विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी कु. सार्थक अमोल गोळे याने शिष्यवृत्ती प्राप्त करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करताना विद्यालयाच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, दर्जेदार वातावरण आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध आहे. शिक्षकांची मेहनत, विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालकांचे सहकार्य यामुळेच विद्यालयाने गुणवत्तेची परंपरा जपली असून भविष्यातही ही यशाची वाटचाल कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. बी. आखाडे यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता दडलेली असून योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ते मोठी यशे मिळवू शकतात, असे सांगितले. शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे आणि सार्थकच्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव रांजणे, पोपट आप्पा रांजणे, सर्व शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नितीन घाडगे यांनी केले.सार्थक अमोल गोळे यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
