वाई प्रतिनिधी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
वाई परिसरात आगामी स्ट्रॉबेरी हंगामाच्या तयारीला वेग आला असून, शेतकऱ्यांसह महिला मजुरांची सध्या स्ट्रॉबेरी रोपांसाठी माती पिशव्या भरण्याची लगबग सुरू आहे. पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाही शेतामध्ये सकाळपासूनच कामगार मोठ्या उत्साहाने काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्ट्रॉबेरी लागवडीसाठी आवश्यक असलेल्या मातीच्या पिशव्या भरून त्यामध्ये रोपे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी सेंद्रिय खतयुक्त मातीचा वापर केला जात असून, ठिबक सिंचनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. आगामी हंगामात दर्जेदार रोपे तयार व्हावीत आणि उत्पादन चांगले मिळावे, यासाठी शेतकरी विशेष काळजी घेत आहेत.
वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादनाला देशभरात मोठी मागणी असल्याने शेतकरी हंगामाच्या पूर्वतयारीत व्यस्त आहेत. या कामामुळे स्थानिक महिला व पुरुष मजुरांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
