३६ जिल्ह्यांतील कलाकारांचा जल्लोष; ७ ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिरात भव्य पुरस्कार सोहळा

मुंबई (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
Bhilar News शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासोबतच महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तेजस्विनी जतीन भिलारे यांना ‘शरद रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रभादेवी-दादर येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने बचत गटांच्या माध्यमातून केलेले कार्य, विविध सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग तसेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत तेजस्विनी भिलारे यांची ‘शरद रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण व सामाजिक स्तरावरील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची दिशा मिळण्यास मदत झाली असून, महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे महाबळेश्वर तालुक्याच्या शिरपेच्यामध्ये मानाचा तुरा रोवल आहे हा पुरस्कार मिळाल्यामुळे माझ्या आजपर्यंतच्या कार्याची पोचपावती मिळाली असून यापुढेही अशाच प्रकारचे महिला सक्षमीकरणाचे काम मी अधिक प्रभावीपणे करत राहील त्यासाठी हा पुरस्कार मला ऊर्जा देत राहील अशी भावना यावेळी तेजस्विनी भिलारे यांनी व्यक्त केली.
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, पत्रकारिता, आरोग्य, कामगार, उद्योजकता तसेच युवा नेतृत्व अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, सचिव हरिश्चंद्र जंगम, उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर, कार्याध्यक्ष गणेश पाटील, ॲड. प्रल्हाद भिलारे आणि खजिनदार सुरेश पाटील यांनी पुरस्कार सोहळ्याची घोषणा केली आहे.
या सोहळ्यात माजी खासदार व समाजसेवक रामशेठ ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार, जयंत पाटील (शेकाप) यांना सामाजिक सेवा, शशिकांत शिंदे यांना कामगार क्षेत्र, दीपक भातुसे यांना पत्रकारिता, मंगेश चिवटे यांना आरोग्यसेवा, तर अमित ठाकरे व रोहित पवार यांना युवा नेतृत्वासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. निळकंठ शिवाचार्य (धारेश्वर महाराज) तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर साबळे महाराज यांचाही त्यांच्या धार्मिक व कीर्तन क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात येणार आहे.
अभिनेते किरण माने, आगरी-कोळी समाजाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या जानकीबाई वासकर, डॉ. मदन कोठुळे, संजय (बाबा) गायकवाड, डॉ. कनक नागले, उद्योजक हर्षवर्धन देशमुख, दैनिक ‘पुण्यप्रताप’चे संपादक विवेकानंद पाटील, चंद्रकांत दळवी आणि विकी खोकरे यांचाही पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. तमाशा कलेतील योगदानाबद्दल चंद्रकांत गुढेकर यांचा गौरव करण्यात येणार असून कै. पांडुरंग गुढेकर यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
३६ जिल्ह्यांतील कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
या पुरस्कार सोहळ्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील कलाकारांना आपली कला सादर करण्याची मिळणारी संधी. आदिवासी नृत्य, समयी नृत्य, लावणी, बतावणी, पोवाडा, अभंग, गवळण तसेच विविध पारंपरिक गीतांचे सादरीकरण या वेळी करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतांचेही सादरीकरण होणार आहे.
वारकरी दिंडी ठरणार विशेष आकर्षण
कार्यक्रमापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, डी. एल. रोड येथून भव्य वारकरी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील कलाकार पारंपरिक वेशभूषेत या दिंडीत सहभागी होणार आहेत. ह.भ.प. ज्ञानेश्वर साबळे महाराज यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून दिंडी सोहळ्याची सांगता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे.
दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत पुरस्कार वितरणासोबत विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या भव्य सोहळ्यास सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याचे सातारा जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे सर तसेच प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी केले आहे.
कला, संस्कृती आणि वारकरी परंपरेला प्रोत्साहन देण्यासोबतच नवोदित व उपेक्षित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांनी सांगितले.
या सोहळ्यास राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार, संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील, मंत्री आशिष शेलार, संजय शिरसाट, मकरंद आबा पाटील, भरतशेठ गोगावले, मुंबईच्या महापौर रितू तावडे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणाऱ्या तेजस्विनी भिलारे यांच्या ‘शरद रत्न’ सन्मानामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून येणारे कलाकार, पुरस्कारार्थी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत ‘न भूतो न भविष्यती’ असा भव्य-दिव्य सोहळा करण्याचा प्रतिष्ठानचा मानस असून, हा कार्यक्रम संस्मरणीय ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
