टाकाऊ वस्तूंमधून फुलणार विद्यार्थ्यांची सर्जनशीलता; ‘वेस्ट टू बेस्ट’द्वारे पर्यावरण संवर्धनाला चालना
भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
पर्यावरण संरक्षण, कचरा कमी करणे, पुनर्वापराची सवय वाढविणे आणि विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद, नेस्ले प्रणित हिलदारी आणि प्लॅन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व शाळांसाठी ‘वेस्ट टू आर्ट स्पर्धा २०२६ (वेस्ट टू बेस्ट)’ आयोजित करण्यात आली आहे. नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये स्रोतस्तरावर कचरा वर्गीकरण, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या स्पर्धेत वापरात नसलेल्या वस्तूंमधून उपयुक्त, आकर्षक आणि नाविन्यपूर्ण कलाकृती तयार करण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. प्लास्टिक, कागद, पुठ्ठा, कापड, धातू, लाकूड, टायर तसेच इतर टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करून तयार केलेल्या कलाकृती स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार आहेत. “तुमची कलाकृती बनू शकते पांचगणीच्या सौंदर्याचा एक भाग!” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.स्पर्धेचे दोन गट करण्यात आले असून, गट क्रमांक १ मध्ये इयत्ता १ ली ते ५ वी आणि गट क्रमांक २ मध्ये इयत्ता ६ वी व त्यावरील सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. सादर करण्यात आलेल्या कलाकृतींचे मूल्यांकन नाविन्यपूर्णता, उपयुक्तता, पर्यावरणपूरकता, पुनर्वापराचे प्रमाण आणि सादरीकरण या निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कलाकृतींना प्रमाणपत्रे आणि विशेष पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.याशिवाय निवडक कलाकृतींचे विशेष प्रदर्शन भरविण्यात येणार असून, पांचगणी शहराच्या सौंदर्यीकरण उपक्रमात त्यांचा वापर करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जबाबदार नागरिकत्व आणि सर्जनशील पुनर्वापराबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे.स्पर्धेसाठी कलाकृती सादर करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२६ असून, सहभागी विद्यार्थ्यांनी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री. गणेश शेडगे (हिलदारी) – ९५०३०४९०३१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.या उपक्रमासाठी पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील, नगराध्यक्ष श्री. दिलीपभाऊ बगाडे, आरोग्य सभापती सौ. राजश्री सणस तसेच सर्व नगरसेवक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पांचगणीतील सर्व शाळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा आणि पर्यावरणपूरक, स्वच्छ पांचगणी घडविण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

