bhilar
भिलार | प्रतिनिधी
१ जुलै २००५ हा दिवस भिलार गावाच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी दिवस म्हणून आजही स्मरणात आहे. त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिमुसळधार पावसाचा मोठा फटका भिलार गावालाही बसला. अतिवृष्टीच्या जखमा २० वर्षानंतरही भिलारवासियांच्या मनावर ताज्या आहेत.
संततधार पावसामुळे भिलारमधील नारळाबावी परिसरात अचानक जमिनीला मोठ्या भेगा पडू लागल्या. क्षणार्धात परिस्थिती इतकी भीषण झाली की, अनेकांची घरे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागली. आयुष्यभराच्या कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ नागरिकांवर आली. त्या क्षणांच्या आठवणी आजही अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणतात.
या भीषण नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन (लँडस्लाइडिंग) झाले. तब्बल ३८ घरे धोक्यात आली, तर ४२ कुटुंबांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते.
घटनेनंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील, अजित पवार, श्रीनिवास पाटील, पतंगराव कदम, आमदार मकरंद पाटील, दिलीप वळसे पाटील, आमदार शशिकांत शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भिलारला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी आपत्तीग्रस्त कुटुंबांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली.
आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी बाळासाहेब भिलारे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बाधित ४२ कुटुंबांना शासनामार्फत हक्काची घरे उपलब्ध झाली. विशेष म्हणजे, या आपत्तीचा फटका स्वतः बाळासाहेब भिलारे यांनाही बसला होता. त्याच काळात ते मुंबईमध्ये तब्बल २६ तास पावसाच्या पाण्यात वाहनासह अडकून पडले होते.
काळाच्या ओघात भूस्खलन झालेल्या परिसराचे सपाटीकरण करण्यात आले. आज त्या ठिकाणी सुंदर नाना-नानी पार्क विकसित करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड करण्यात आली आहे. एकेकाळी भीती आणि दुःखाचे प्रतीक असलेला हा परिसर आज हिरवाईने नटलेला असून पर्यावरण संवर्धनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
वीस वर्षे उलटून गेली असली तरी १ जुलै २००५ च्या त्या काळ्या दिवसाच्या आठवणी भिलारकरांच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत. मात्र, संकटावर मात करून गावाने नव्या उमेदीने विकासाचा मार्ग स्वीकारला, हीच भिलारच्या जिद्दीची आणि एकजुटीची खरी ओळख ठरली आहे.
