panchgani
भिलार (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अभियानात २० हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पाचगणी गिरीस्थान शहराने संपूर्ण भारतात द्वितीय क्रमांक पटकावून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दिल्ली येथे आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पाचगणी गिरीस्थान पालिकेला या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत पाचगणीने हे देदीप्यमान यश संपादन केले आहे.
नवी दिल्ली येथील या दिमाखदार सोहळ्यात पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे,घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेखर कासुर्डे, नगरसेवक गणेश कासुर्डे आणि शहर समन्वयक ओंकार ढोले यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीत दरवर्षी लाखो पर्यटकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीतही शहराची स्वच्छता आणि सौंदर्य अबाधित राखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे.
या मोहिमेच्या यशामध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील, उपाध्यक्षा माधुरी कासुर्डे, आरोग्य सभापती राजश्री सणस आणि सर्व नगरसेवकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यासोबतच शहराचे आरोग्य रक्षक असलेले सर्व सफाई कर्मचारी, सफाई ठेकेदार, स्वच्छाग्रही आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घेतलेली अविरत मेहनत या यशाचा मुख्य कणा ठरली आहे.पाचगणी शहरात ओला, सुका, प्लास्टिक, ई-कचरा आणि सॅनिटरी कचऱ्याचे घरोघरी जाऊन १०० टक्के वर्गीकरण व संकलन केले जाते. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक स्वतः पुढाकार घेऊन घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करतात. प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन, स्वच्छता कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि नागरिकांचा सक्रिय लोकसहभाग यामुळे पाचगणीने राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संपूर्ण शहरातून आनंद व्यक्त केला जात असून, सर्व स्तरांतून पालिकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
