अस्वच्छतेमुळे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; दिवाळी हंगामात हॉटेलची कोंडी
महाबळेश्वर/प्रतिनिधी (टीम कृष्णकुंज न्यूज नेटवर्क)
Mahabaleshwar News दिवाळीच्या ऐन पर्यटन हंगामाची लगबग सुरू असतानाच येथील बहुचर्चित आणि नामांकित ‘ब्राइट लँड’ हॉटेलच्या स्वयंपाकघरावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक कारवाई करत किचन सील केले आहे. स्वयंपाकघरात आढळून आलेल्या अस्वच्छतेमुळे आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे ही कारवाई करण्यात आली असून, जोपर्यंत नियमांची पूर्ण पूर्तता होत नाही तोपर्यंत किचन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऐन मोसमात घडलेल्या या प्रकारामुळे महाबळेश्वरच्या पर्यटन व व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. या काळात पर्यटकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील बड्या हॉटेल्सची अचानक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत पथकाने ब्राइट लँड हॉटेलच्या स्वयंपाकघराची पाहणी केली. यावेळी किचनमध्ये स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत नसल्याचे आणि गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता किचन तात्काळ सील ठोकले.
महाबळेश्वरमधील सर्वात मोठ्या आणि अलिशान हॉटेल्सपैकी एक म्हणून ब्राइट लँडची ओळख आहे. येथे वर्षभर मोठे लग्न समारंभ, कॉर्पोरेट बैठका आणि व्हीआयपी कार्यक्रम पार पडतात. अशा मोठ्या हॉटेलवरच एफडीएची कारवाई झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर हॉटेल प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुसरीकडे, नामांकित हॉटेल्सकडून स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होणे गंभीर असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवरून उमटत असून, एफडीएने ही मोहीम अशीच कडक सुरू ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.
हंगामाच्या तोंडावर मोठा दणका
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये महाबळेश्वर हाऊसफुल्ल असते. याच काळात लग्नसराई आणि पर्यटकांच्या आगाऊ बुकिंगमुळे हॉटेल्सवर मोठा ताण असतो. मात्र, ऐन गर्दीच्या काळातच मुख्य किचन सील झाल्याने हॉटेल व्यवस्थापनाची मोठी कोंडी झाली आहे. बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या बड्या हॉटेल्सच्या किचनमधील वास्तव या कारवाईमुळे समोर आल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.
